सातारा प्रतिनिधी । उमेद अंतर्गत नोंदणीकृत महिला बचतगटांना मत्स्यव्यवसायासाठी जिल्हा परिषद मालकीचे पाझर तलाव देण्यात येणार आहेत. २१ पाझर तलावांसाठी गुरुवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी सभागृहात लिलाव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुणकुमार दिलपाक यांनी दिली आहे.
महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत. सातारा जिल्हा परिषदेनेही नेहमीच महिला हिताचे धोरण राबवून महिलांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांच्या पुढाकाराने उमेद अंतर्गत नोंदणी असणाऱ्या महिला बचतगटांना मत्स्यव्यवसायासाठी २१ पाझर तलाव लिलाव पध्दतीने देण्यात येणार आहेत. पाच वर्षांकरीता ठेका पध्दतीने, दोन लिफाफा पध्दतीने गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात लिलावाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
महिला बचत गटांनी मूह कागदपत्रासह (उमेदअंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र, बचतगट सदस्यांची यादी व बचत गट अध्यक्ष, सचिव यांच्या आधारकार्ड व इतर कागदपत्रांसह) लिलावावेळी उपस्थित राहायचे आहे. कागदपत्रांची तपासणी करुन पात्र ठरलेल्या बचत गटांना लिलावामध्ये सहभागी होता येणार आहे.
एका पाझर तलावास एकापेक्षा जास्त बचतगटांची मागणी आल्यास जास्त रकमेची बोली लावणाऱ्या बचतगटास सदरचा पाझर तलाव ठेक्याने देण्यात येणार आहे. एका अथवा सर्व पाझर तलावांसाठी बचत गटामार्फत लावण्यात आलेली बोली रक्कम ही जिल्हा परिषदेस समाधानकारक न वाटल्यास सदरची लिलाव प्रकिया रद्द करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेने राखून ठेवला आहे.