कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण मतदार संघाच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून त्रिस्तरीय तपासणी होऊनच मतदान मोजणी कक्षाकडे ओळखपत्र असणाऱ्यांनाच सोडण्यात येईल, दि. 23 तारखेला सकाळी सहा वाजता स्ट्रॉंगरूम उघडली जाईल. सात वाजेपर्यंत टपाली मतपेट्या टेबलवर आणण्यात येतील. बरोबर आठ वाजता गोपनीयतेची शपथ घेऊन टपाली मतमोजणीस सुरुवात होईल. त्यानंतर आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत सर्व टेबलवर मशीन्स आणल्या जातील आणि बरोबर साडेआठ वाजता मशीनच्या मतमोजणीस सुरुवात होईल. मशीनमधील मतमोजणीचे 20 टेबलवर 17 ते 18 राउंड होतील आणि त्यानंतर निकाल घोषित केला जाणार असल्याची माहिती कराड दक्षिण चे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मतमोजणी अनुषंगाने आयोजित नियोजन बैठकीत दिली.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप कोळी, आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी एस एस पवार, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, नायब तहसीलदार विश्वजीतसिंह राजपूत, प्र.नायब तहसीलदार युवराज पाटील, प्रांत कार्यालयाचे गोपाल वसू, प्रकाश नागरगोजे, नोडल अधिकारी प्रमोद मोटे, मीडिया कम्युनिकेशनचे दिलीप माने उपस्थित होते.
मतदान मोजणी अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आत्तापर्यंत सर्वांच्या सहकार्याने गेली दोन महिने राबविलेली मोहीम यशस्वी झाली आहे. आता मतमोजणीची शेवटची मोहीम फत्ते करूया. मतमोजणीसाठी एकूण 33 टेबल ठेवण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिल्या 10 टेबलवर टपाली मतमोजणी, नंतरच्या 20 टेबलवर मशीनची मतमोजणी व उर्वरित तीन टेबलवर सैनिकांची मतमोजणी होईल. यासाठी काउंटिंग सुपरवायझर, मायक्रो ऑब्झर्वर, असिस्टंट मायक्रो ऑब्झर्वर, एआरओ अशी नियुक्ती करण्यात आली आहे.
आज सकाळी 11.30 वा. निवडणूक निरीक्षक गीता ए. यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची मतदानानंतरची व मतमोजणीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली. यामध्ये मतदान टक्केवारी सरासरीपेक्षा जास्त व सरासरीपेक्षा कमी झालेल्या गावांची माहिती देण्यात आली. तसेच सर्व मतदान प्रक्रियेत सर्वांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल गीता ए. यांनी कौतुक केले व मतमोजणीसही सकाळी सहा वाजता उपस्थित राहून सहकार्य करावे असे सांगून शुभेच्छा दिल्या..