कराड प्रतिनिधी । यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघात १९३ मलकापूर व ३२१ वडगाव हवेली येथे ‘ पिंक बूथ ’ उभारण्यात येणार असून ही दोन्ही मतदान केंद्रे सर्व महिला अधिकारी व कर्मचारी चालवतील, त्यांच्या उत्कृष्ट कामकाजाने ही मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे ( मॉडेल बूथ सेंटर) ठरतील असा विश्वास २६० कराड दक्षिण चे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी व्यक्त केला.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या भारत निवडणूक आयोगाचा हा अनोखा, कल्पक प्रयोग निश्चितच आदर्शवत आहे. २८८ विधानसभा मतदारसंघात अशी ठराविक आदर्श ( मॉडेल) मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. आदर्श व सुसज्ज मतदान केंद्र कसे असावे याचे ही केंद्रे आदर्श उदाहरण ठरणार आहेत.
अचूक कामकाजासाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, आचारसंहिता सहा.निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्र.नायब तहसीलदार युवराज पाटील, यांच्यासह सेक्टर ऑफिसर्स व झोनल ऑफिसर्स प्रयत्नशील आहेत.
दोन ‘ पिंक ‘ आदर्श मतदान केंद्राबरोबरच २५८, नांदगाव हे मतदान केंद्र संपूर्ण ‘ दिव्यांग ‘ व्यक्ती चालवणार असून या केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी १, २ व ३ हे कर्मचारीसुद्धा दिव्यांग व्यक्ती असणार आहेत. या मतदान केंद्रावर ४८४ पुरुष, ४३८ महिला व इतर ० असे एकूण ९२२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आमचे दिव्यांग कर्मचारी सुद्धा ‘ हम भी कुछ कम नही ‘ या उक्तीप्रमाणे आपल्या कामकाजाने आदर्श निर्माण करतील असा विश्वास अतुल म्हेत्रे यांनी व्यक्त केला.
महिलाराच केंद्राच्या कारभारी
सुबक, सुशोभित व आकर्षक अशा या केंद्रात पेयजल, प्रसाधन गृह, अपंगांसाठी ‘व्हील चेअर’, रॅम्प वॉक’ आदि सुसज्ज सुविधा प्राधान्याने देण्यात येणार आहेत. सखी मतदान केंद्र अथवा ‘पिंक बूथ’ मध्ये नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी महिलाच असणार आहेत. यामध्ये अगदी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १,२ व ३, शिपाई व पोलिस कर्मचारीही महिलाच असतील, त्यामुळे येथे फक्त महिलाराजच केंद्राच्या कारभारी राहतील. १९३ मलकापूर मतदान केंद्रावर ३०६ पुरुष, २७० महिला व इतर ० असे एकूण ५७६ मतदार आहेत. तर ३२१ वडगाव हवेली मतदान केंद्रावर ४९३ पुरुष, ४७२ महिला व इतर ० असे एकूण ९६५ मतदार आहेत.