कराड दक्षिणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदान मशीनच्या सुरक्षिततेबाबत माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज कराड दक्षिण मतदार संघात रिंगणात असलेल्या सर्व उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृतरित्या नियुक्त प्रतिनिधीनी स्ट्रॉंगरूमला भेट दिली. आणि एकूण सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक निरीक्षक गीता ए, व निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरूम सील व त्यांच्या कडेकोट बंदोबस्तातील सुरक्षिततेबाबत आवश्यक ती सर्व माहिती उमेदवारांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.

यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधीसह कराड दक्षिणच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्र.नायब तहसीलदार युवराज पाटील उपस्थित होते. दरम्यान, सुरक्षा व्यवस्थेची महत्त्वाची बाब असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तसेच स्ट्रॉंगरूम मध्ये अत्यंत सुरक्षितपणे पेट्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या मशीन्स याची प्रतिनिधींनी खात्रीशीररित्या सुरक्षित असल्याबाबत पाहणी केली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हेत्रे म्हणाले, मशीन सिलिंगचे काम उद्या सोमवारी सकाळी आठ वाजता सुरू होईल. त्यासाठी ३९ टेबलवर ३९ सेक्टर अधिकारी नियुक्त करण्यात आले असून आपण उमेदवारांच्या सर्व प्रतिनिधींनी सकाळी ८ वाजता हजर राहून सीलिंग प्रक्रियेस सहकार्य करावे. प्रारंभी इलेक्शन कमिशनने दिलेल्या इंजिनिअर यांचेकडून मशीनमध्ये सिम्बॉल लोड केले जातील. त्यामध्ये बॅटरी टाकून मतपत्रिका लावली जाईल व नंतर एक-एक चा मॉकपोल घेऊन चिठ्ठया योग्य निघताहेत का याची खात्री करून सीआरसी केली जाईल. व मशीन मध्ये ०० मते आहेत का हे दाखविले जाईल.

त्यानंतर ३४२ मशीन्सपैकी पाच टक्के मशीन्स काढून त्यामध्ये १००० मतांचा मॉकपोल घेतला जाईल. मशीनवर ८ उमेदवार त्यांची चिन्हे व १ नोटाचे बटन असेल. आपणासमोर इनकॅमेरा मॉकपोल घेतला जाईल. एक हजार मतदान पूर्ण झाल्यानंतर क्लोज चे बटन दाबून व्हीव्हीपॅट मधील स्लीप काढून काउंट केल्या जातील व त्यानंतर सीआरसी घेऊन मशीन केंद्रासाठी सज्ज झाल्या आहेत याची खात्री दिली जाईल, असे म्हेत्रे यांनी म्हंटले.