कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केल्यानंतर भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. “विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष भावना, सुड भावना नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आपल्याला एक लोकप्रतिनिधी, मोठा नेता म्हणून खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन राजकारण करायला नको होते. आम्ही तसे कधीही केले नाही, कोणाला करूही दिले नाही. कराडकरांनी विजयाच्या रूपाने मला हा कौल दिला असून कोणत्याही परिस्थितीत कराडकरांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे डॉ. अतुलबाबा भोसले यांनी म्हटले.
भाजप महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी निवडणूक निकाल प्रमाणपत्राचा निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून स्वीकार केला. यानंतर त्यांची कराड दक्षिणमधील कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त करत मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रीतिसंगम येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीसाठी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, “कराड शहराच्या विकासाचे व्हिजन आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा मानस डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो. यामध्ये कराडच्या विकासासाठी संधी देण्याचे आवाहन मी कराड दक्षिणमधील मतदारांना केले होते. , “भारतीय जनता पक्ष व महायुतीने आपल्यावर विश्वास टाकत आमदारकीचे तिकीट दिले, यातच आपल्याला आनंद आहे. तसेच कराड दक्षिणमधील मतदारांनी आपल्याला स्वीकारले, यात आनंद असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे.