कराड प्रतिनिधी । कराड शहराला पाणी पुरवठा करणारी साईपलाईन नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने तीन दिवसांपासून कराडकरांना पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. या पाणी समस्येवाट तोडगा काढण्यासाठी राजकीय नेत्यांनी थेट पंपिंग स्टेशन गाठलं.
ऐन पावसाळ्यात कराडकरांवर पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. कराड शहर आणि परिसराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनच नदीच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आषाढी एकादशी आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर् पाणी समस्या दूर व्हावी, म्हणून माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि भाजप नेते डॉ. अतुल भोसलेंनी मंगळवारी थेट पंपिंग स्टेशनवर जाऊन लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.
कराडकरांना तीन दिवस नाही पाणी
कराडलगतच्या वारूंजी गावच्या हद्दीत कोयना नदीपात्रातून पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आणण्यात आली आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीचा प्रवाह वाढला आणि पाईपलाईन वाहून गेली. त्यामुळे तीन दिवसांपासून कराडकरांना पाणी नाही. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जुने पंपिंग स्टेशन कार्यान्वित करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सोमवारीच नगरपालिका प्रशासनाकडे केली होती.
काँग्रेस, भाजप नेत्यांची धाव
पाणी समस्या लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी जुन्या पंपिंग स्टेशनवर जाऊन अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना केली. तसेच सद्यस्थितीत टँकरने पाणीपुरवठा करावा. टँकरची संख्या वाढवावी. पाणी पुरवठ्याचे वॉर्डनिहाय नियोजन करावे. जुनी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी. काही महिन्यांसाठी नवीन पुलावरून पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करावा. कराडच्या शुक्रवार पेठेतील जुने वॉटर हाउस पुन्हा सुरू करावे, असे पर्याय आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवले.
काँग्रेस, भाजपच्यावतीने टँकरने पाणीपुरवठा
विधानसभा आणि नगरपालिका निवडणूक तोंडावर असल्याने कराडमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीत राजकीय पक्षांनी टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला. भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी कृष्णा रुग्णालयाच्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून, तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण समर्थकांनी छोट्या छोट्या टँकरद्वारे प्रभागांमध्ये नागरीकांना पाणी पुरवठा करत नागरीकांना दिलासा दिला.