मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी कुठे शेतकरी मतदान केंद्र तर आदर्श मतदान केंद्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मतदान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा मानला जातो. विधानसभा निवडणुकीच्या निमिताने जिल्ह्यात उद्या बुधवारी लोकशाहीचा उत्सव पार पडणार आहे. तो धामधूममध्ये साजरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, उद्या प्रत्यक्ष मतदान पार पडणार असून मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात काही मतदान केंद्रावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यामध्ये कुठे शेतकरी मतदान केंद्र तर कुठे आदर्श मतदान केंद्र केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर सेक्टर ऑफीसर 436, केंद्राध्यक्ष 3956 व इतर कर्मचारी 11869 असे एकूण 16261 कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी प्रशासनाकडून सुसज्ज अशी मतदान केंद्र उभारण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार त्या त्या मतदान केंद्र प्रमुखांनी कष्ट करून आकर्षक अशी मतदान केंद्रे तयार केलेली आहेत. यामध्ये दहिवडी येथे महात्मा गांधी विद्यालयमध्ये मतदान केंद्र प्रवेशद्वारावर फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. तर पाटण तालुक्यात युवा मतदान केंद्र व सखी मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे.

मेटगुताडचे मतदान केंद्र ठरले आदर्श मतदान केंद्र

महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड येथील मतदान केंद्र क्रमांक – 367 हे सातारा जिल्ह्यातील एक आदर्श मतदान केंद्र ठरले आहे. हे केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उभारण्यात आले आहे. वाई विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या “आदर्श मतदान केंद्र मेटगुताड” या केंद्र मतदारांना आकर्षित करत आहे.

माण मध्ये शेतकरी मतदान केंद्र

258-माण विधानसभा मतदार संघात निवडणूक विभागाच्या वतीने एक वेगळ्या पद्धतीचे मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. या ठिकाणी मतदान केंद्रास शेतकरी मतदान केंद्र असे नाव देण्यात आले असून या केंद्रावर मी मतदान करणार आपणही मतदान करावे, असे घोषवाक्यचे पोस्टर लावण्यात आलेले आहेत.

गृहभेटीसाठी नियुक्त केलेल्या टिम

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मतदानादिवशी गृहभेटीसाठी नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या टिमकडून सकाळी ९.००, दुपारी 12 वाजता व 4 वाजेपर्यंत त्यांना जवाबदारी देण्यात आलेल्या कुटुंबातील किती सदस्यांनी मतदान केलेले आहे? किती राहीलेले आहेत? याचा वेळोवेळी अहवाल ग्रामीण भागासाठी संबंधित गटविकास अधिकारी व नागरी भागासाठी संबधित नगरपालिका मुख्याधिकरी यांच्याकडून घेण्यात येऊन जास्तीत जास्त मतदान कशा प्रकारे होईल याबाबत कार्यवाही करण्यात यावी,अशा सूचना दिल्या आहेत.

गृह मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज अखेर वय वर्ष 85 च्या वरील एकूण 1914 मतदार असून त्यापैकी 1787 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच PWD मतदार एकूण 323 असून त्यापैकी 311 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित मतदार हे समक्ष केंद्रावर जाऊन मतदान करणार आहेत.

कायदा व सुव्यवस्था –

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 3097 पोलिस कॉन्टेबल तसेच 2940 होमगाडर्‍ यांची नेमणूक करणेत आलेली आहे.केंद्रीय निमलष्करी दल 8 कंपनी व राज्य राखीव दलाची 1 कंपनी यांची नेमणूक केलेली आहे.