सातारा प्रतिनिधी । जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या आत्तापर्यंत झालेल्या बैठकांच्या कार्यवाहीबाबत आज साताऱ्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीस सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदा श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित राहून आढावा घेतला. “भविष्याचा विचार करुन शिक्षण, आरोग्य व पाण्यासाठी काम करावे,” अशा सूचना खासदार पाटील यांनी बैठकीत केल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते. यावेळी खासदार पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील विकास कामांना केंद्र व राज्य शासनाकडून निधी आला आहे, अशी कामे आचार संहिता लागण्यापूर्वी सुरु करावे. तसेच मुलांच्या परीक्षेचा कालावधी सुरु आहे. रस्त्यांच्या कामांमुळे परीक्षा देण्यास उशिर होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने खबरदारी घ्यावी. महामार्गावरील अपघातचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग महामंडळाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मदतीने खंडाळा ते कराड या महामार्गावरील अपघाताचे ब्लॅक स्पॉट शोधून त्याच्यावर कार्यवाही करावी. कोल्हापूर ते पुणे महार्गावरील पथदिवे सुरु आहेत का याची तपासणी करावी.
कोविड काळात आरोग्य विभागाला विविध प्रकारची आरोग्य विषयक यंत्रसामुग्री मिळाली होती. ही यंत्रसामुग्री व्यवस्थीतरित्या ठेवावी. त्याचबरोबर जी शासकीय आरोग्य केंद्रे महिलांच्या जासत प्रसुती करीत आहेत त्या केंद्रांमधील डॉक्टर व कर्मचारी यांचा सत्कार घ्यावा, यासाठी सीएसआर निधीची तरतुद केली जाईल. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून जे विद्यार्थी कौशल्य घेत आहे अशांना उद्योग उभारणीसाठी बँकांमार्फत पत पुरवठा करण्याबाबत सहकार्य करावे. आवास योजनेंतर्गत सातारा जिल्ह्याला एकूण 16 पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्याबद्दल प्रशासनाचे समितीचे अध्यक्ष तथा खा. पाटील व समितीच्या सदस्यांनी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदनही केले.
यावेळी जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार 24 कोटींचा निधी मिळाला असून हे संकूल आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येणार आहे. स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व माझी शाळा आदर्श शाळा हा महत्वपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे मुलांना दर्जेदार शिक्षणाबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत ज्या ज्या विभागांना जबाबदारी दिली आहे ती वेळेत पूर्ण करावी. खासगी हॉस्पीटलमध्ये सेवेबाबत दरपत्रक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत ज्यांनी दरपत्रके लावली नाहीत अशांना नोटीस द्याव्यात महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉट शोधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल. भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. जे उपलब्ध नाही आहे त्याचा नागरिकांनी काटकसरीने वापर केला पाहिजे तसेच शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे, असेही आवाहन त्यांनी केले.