सातारा प्रतिनिधी । लग्नामध्ये राहिलेले १० तोळे सोन्याचे दागिने दिले नाही, या कारणावरून फलटण तालुक्यातील मुंजवडी येथील विवाहितेला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पती, नणंद, सासू आणि सासऱ्याविरूद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लग्नामध्ये राहिलेले १० तोळे सोन्याचे दागिने दिले नाही तसेच शेतातील आणि घरातील कामे करीत नाही, या कारणावरून तेजस्विनी सूर्यकांत गुजले (वय २४, रा. मुंजवडी, ता. फलटण) यांना पती सूर्यकांत विलास गुजले, सासू राधाबाई विलास गुजले आणि सासरे विलास गुलाब गुजले (रा. मुंजवडी) आणि नणंद हिराबाई उर्फ साधना शिवाजी उर्फ लखन चव्हाण (रा. चंद्रपुरी, ता. माळसिरस, जि. सोलापूर) हे संगनमत करून सतत शिविगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास देत होते.
दि. २२ रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास पती सूर्यकांत आणि सासरे विलास यांनी तेजस्विनी हिचे दोन्ही हात पकडून खाली पाडले आणि सासू राधाबाई व नणंद हिराबाई हिने तेजस्विनी यांचे तोंडत जबरदस्तीने उघडून विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा करून कशीतरी तेजस्विनी यांनी आपली सुटका करून पोलिस ठाणे गाठले आणि वरील चौघांजणाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस नाईक काकडे करीत आहेत.