सातारा प्रतिनिधी | जन्मपत्रिका पाहून नाडी चेक करायची असल्याचे सांगून युवतीचा बेडरुममध्ये विनयभंग केल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी ज्योतिषावर शह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संतोष दिनकर चव्हाण (वय ४०), असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दि. १४ फेब्रुवारी रोजी घडली आहे. तक्रारदार युवतीच्या कुटुंबीयांच्या ओळखीने ज्योतीषी संतोष चव्हाण हा दुपारी ४ वाजता युवतीच्या घरी गेला होता. घरामध्ये तक्रारदार युवती, तिचा भाऊ आणि आई होती. ज्योतिषाने युवतीची पत्रिका पाहून ‘मुलीला पोटाचा मोठा आजार होणार आहे. भविष्यात लग्न होणार नाही,’ असे सांगून भावनिक केले.
जन्मपत्रिका पाहून नाडी चेक करायची असल्याचे सांगून युवतीला बेडरुममध्ये थांबण्यास सांगितले. हीच संधी साधत ज्योतिषाने युवतीचा विनयभंग केला. त्यामुळे युवती घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच कोणाला काहीही न सांगण्याची धमकी दिली. तसेच ‘तुझ्यावरील सर्व संकटे मी दूर करु शकतो,’ असे सांगून तिला भावनिक केले.
ज्योतिषाने घरातून जाताना युवतीचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर दि. १६ फेब्रुवारी रोजी ज्योतिषाने तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज करण्यास सुरुवात केली. यामुळे युवती घाबरली. तिने दि. १४ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेविषयी व १६ रोजी आलेल्या ज्योतिषाच्या मेसेजची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानुसार कुटुंबियांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात ज्योतिषाविरुध्द तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी ज्योतिषावर गुन्हा दाखल केला आहे.