सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांकडून प्रचार सभांना सुरुवात करण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या काळात हजारो हातांना काम मिळाले आहे. त्यातून लाखोंची उलाढाल होत आहे. सध्या प्रचार सुरू झाल्याने मंडप व्यावसायिक, वाद्य व्यावसायिक, खानावळी चालविणारे, तसेच अन्य व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. सध्या कष्टकरी मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने एरवी कामाच्या शोधात असणारे हे कामगार आता निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध कामांमध्ये गुंतले आहेत.
विधानसभा निवडणुका सुरू झाल्या की, प्रशासनाकडून तयारी सुरू होते. त्याअनुषंगाने होणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांच्या बैठका, उमेदवारांच्या प्रचारसभा, तात्पुरती प्रचार कार्यालये, प्रिंटिंग प्रेस, खानावळी, मंडपवाले, वाद्य व्यावसायिक, साउंड सिस्टिम आदींना या कालावधीत कामे मिळतात.
निवडणुकीमुळे वातावरण गरम
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाल्याने राजकीय वातावरण तापत आहे. प्रचार सभांमधून अगदी एकमेकांची उणी धुनी काढण्याचे काम केले जात आहे.
मजुरांच्या हाताला मिळाले काम!
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाचे देखील काम वाढले आहे. उमेदवारांचाही प्रचार सुरू झाल्याने विविध कामांसाठी मजूर लागत आहेत. ज्या ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. त्याठिकाणी मजुरांची खूप गरज भासत आहे.
जेवणावळींत गर्दी
सध्या सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात प्रचारसभा, मिरवणुकी सुरू झाल्या आहेत. या सभांसाठी येणाऱ्या मतदारांकरिता उमेदवार खर्च करीत असल्याने हॉटेल्स, खानावळीत गर्दी मोठ्या संख्येने होऊ लागली आहे.
फेटे, हार, बुके अन् फुलांचं सोनं!
मतदार संघामध्ये सध्या रात्रीच्यावेळी उमेदवारांच्या प्रचारसभा रंगू लागल्या असून सत्कारासाठी लागणाऱ्या हार-तुरे-फेटे आणि फुले यांची मागणी वाढली आहे. कार्यकर्ते आपल्या लाडक्या उमेदवार व पदाधिकाऱ्याचा सत्कार करण्यासाठी हार आणि तुरे पुष्पगुच्छ देखील आणत आहेत.
यांनाही मिळतोय रोजगार
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. याअनुषंगाने वाहतूक वाढते. त्यादृष्टीने ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, डिझायनर्स, बॅनर प्रिंटर्स, स्टिकर, फ्रेम मेकर्स, पत्रक, झेंडे बनवणारे आदी विविध व्यावसायिकांना या काळात सुगीचे दिवस येत असतात. या काळात त्यांचा व्यवसाय लक्षणीय वाढतो.
मंडप, खुर्चीवाला भाव खातोय
१) मंडप : ६.०४ ते ७.९ रू. प्र.चौ. फू. प्रतिदिन
२) कमानी : १० रु. प्रति चौ. फूट प्रतिदिन
३) खुर्चा : ३० रु. प्रति नग, प्रति दिन
४) माईक सिस्टीम : ३४७३ प्रति नग, प्रति दिन