सातारा प्रतिनिधी | राज्यातील विधानसभा निवडणुकीची मंगळवारी निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी 3.30 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेत झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे ( Vidhansabha Election 2024 ) वेळापत्रक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची मोठी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाकडून आचार संहितेची घोषणा होण्यापूर्वीपासूनच घडामोडींना वेग आला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत सातारा जिल्ह्यात पहायला मिळणार आली तरी वंचित बहुजन आघाडीकडून देखील जिल्ह्यातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.
विधानसभेचा बिगुल वाजला असला तरी सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदारसंघाची मतमोजणी डिस्ट्रिक मार्केटिंग फेडरेशनच्या गोडावूनमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत सातारा आणि जावली तालुक्यांतील 464 मतदान केंद्रांवर सुमारे 3 लाख 41 हजार 833 मतदार हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे 3 हजार 600 कर्मचार्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
असा आहे विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम…
विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे
असे आहेत सातारा जिल्ह्यातील विद्यमान आमदार
1) (255) फलटण विधानसभा – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी – शरद पवार)
2) (256) वाई विधानसभा – मकरंद पाटील (राष्ट्रवादी – अजित पवार)
3) (257) कोरेगाव विधानसभा – महेश शिंदे (शिवसेना- एकनाथ शिंदे)
4) (258) माण विधानसभा – जयकुमार गोरे (भाजप)
5) (259) कराड उत्तर विधानसभा – बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी – शरद पवार)
6) (260) कराड दक्षिण विधानसभा – पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
7) (261) पाटण विधानसभा – शंभूराज देसाई (शिवसेना – एकनाथ शिंदे)
8) (262) सातारा विधानसभा – शिवेंद्रराजे भोसले (भाजप)