हवाला रक्कम लूटप्रकरणी आसिफ शेखला अटक; 1 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पुणे – बंगळूर महामार्गावरील कराड तालुक्यातील मलकापूर हद्दीत हवालाची तीन कोटी रुपयांची रक्कम लुटणाऱ्या टोळीतील प्रमुख संशयितांपैकी एक असलेल्या आसिफ सलीम शेख या संशयिताला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले असता एक नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत.

कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलकापूरमधील ढेबेवाडी फाटा परिसरात सोमवार, १४ ऑक्टोंबरला मध्यरात्री दीड ते तीन च्या सुमारास मुंबईहून हुबळीकडे तीन कोटी रुपयांची हवाला रक्कम घेऊन निघालेल्या दोघांना मारहाण करून लूटमार करण्यात आली होती. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील काही प्रमुख संशयित पलायन करण्यात यशस्वी झाली होती. अटक केलेल्या संशयितांकडून चौकशीवेळी आसिफ शेख याचे नाव समोर आले होते.

याप्रकरणी ४२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली सात विविध पथके कार्यरत होती. त्यानंतरही आसिफ शेख पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला होता. मात्र सोमवारी रात्री त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. मंगळवारी त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे हजर करण्यात आले असता त्यास एक नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. याप्रकरणी आणखी काही संशयितांचा सहभाग आहे का ? पलायन केल्यानंतर आसिफने कोणकोणत्या ठिकाणी आश्रय घेतला होता ? लुटीतील रक्कम आसिफ यांनी कोठेकोठे वापरली ? त्याचबरोबर संशयित आसिफला कोणीकोणी मदत केली ? याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.