सातारा प्रतिनिधी । महायुतीकडून वारंवार रिपाइंला डावलले जात असून, त्यांनी रिपाइंची गरज नाही, असे जाहीर करावे. सातारा जिल्ह्यातील आठही विधानसभा जागा आम्ही लढवणार आहे. वाईतून स्वप्निल गायकवाड यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असल्याची माहिती रिपाइंचे प. महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड (Ashok Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अशोक गायकवाड यांनी सातारा येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गायकवाड म्हणाले की, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली असून, आठ ही जागा लढवायची तयारी आहे. वाई, सातारा, जावली, कोरेगाव या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बुथ कमिट्या बांधल्या आहेत. महायुतीने एक जरी जागा दिली तरी आम्ही तयार आहे. महायुती वारंवार रिपाइं पक्षाला डावलत आहे. रामदास आठवले यांचा अवमान केला जात आहे. महायुतीने आम्हाला गृहीत धरू नये. सन्मान दिला तर सोबत अन् अवमान केला तर महागात पडेल.
यावेळी स्वप्निल गायकवाड म्हणाले, आठ दिवसांत तालुकानिहाय मेळावे होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ५८ जागा असून, त्यातील ८ जागा मिळाव्यात. पालकमंत्री एक महिन्यात २ कोटी रुपये ज्या ठिकाणी शिवसेना आमदार नाहीत त्यांना देत आहेत. आम्हाला कोठेही विचारात घेतले जात नाहीत. दहा लाखांच्या कामासाठी आमदाराच्या शिफारशी आणायला सांगितले जात असून, आम्हाला सन्मान मिळत नसल्याचे गायकवाड यांनी सांगितले.