महायुतीत साताऱ्यावर ‘रिपाइं’न केला दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्यात २०१४ मध्ये महायुतीचा जन्म झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ ‘रिपाइं’ला सोडण्यात आला होता. त्यावेळी आमच्यासोबत गद्दारी आणि बंडखोरी झाली होती. तरीही आम्ही ८३ हजार मते घेतली. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा आहे. नाहीतर आताच्या निवडणुकीत आम्हाला कोणी गृहित धरु नये,’ अशी स्पष्ट भूमिका ‘रिपाइं’ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी जाहीर केली.

रिपाईच्या वतीने सातारा येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी सर्वगोड, अण्णा वायदंडे, आप्पा तुपे, पूजा बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी गायकवाड म्हणाले, राज्यातील युतीत ‘रिपाइं’चे रामदास आठवले आले आणि महायुतीचा जन्म झाला. या महायुतीमुळेच २०१४ ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याचवेळी सातारा मतदारसंघ महायुतीतून ‘रिपाइं’ला सोडण्यात आला होता. पण, निवडणुकीत आम्हाला वाऱ्यावर सोडले. असे असलेतरी आताही महायुतीतून या मतदारसंघावर आमचाच दावा आहे.

उमेदवार कोण असणार हे पक्ष ठरवेल. पण, ही जागा ‘रिपाइं’ला मिळाली तरच युती धर्म राहणार आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत आम्हाला जागा न मिळाल्यास जशास तसे उत्तर देण्यासही आम्ही तयार आहोत. कारण, आम्ही नाराज आहोत. सन्मानाने घेतले तर सोबत राहू नाहीतर संबंधितांना जागाही दाखवून देवू. २०१४ च्या निवडणुकीत आम्हाला ८३ हजार मते मिळाली ती आमच्या पक्षाचीच होती. त्यामुळे आता एक लाख मते आमच्याकडे असल्याचे गायकवाड यांनी म्हटले.