सातारा प्रतिनिधी । जावली तालुक्यातील आसनी येथे गेल्या चार ते पाच दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने गावातील कुत्र्यांचा फडशा पाडल्यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काल शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना गावातच बिबट्याने दर्शन झाले आहे. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, जावली तालुक्यातील आसनी गावाला लागूनच डोंगर आहे तसेच महाबळेश्वरवरून सातारला जाणारा राजमार्ग या गावाच्यावरूनच जातो. गावालगत शिवाय जंगल क्षेत्र असल्याने या भागात बिबट्यांचावावर अधून मधून आढळून येतो. मात्र, जंगलात त्यांना अन्न मिळत नसल्याने आता आत्यानी आपला मोर्चाचे मानवीवस्तीकडे वळवला आहे.
गेली चार दिवस झाली बिबट्या आसनी गाव शिवारात वावरत असून अद्याप या बिबट्याने कोणावर हल्ला केला नसला तरी गावातील कुत्र्यांचा मात्र फडशा पाडला आहे. गावातील ग्रामस्थांवर हल्ला करण्यापूर्वी वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आसनी येथील ग्रामस्थांनी केली आहे.