सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण या आठ मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहे. वाई विधानसभा मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून मकरंद पाटीलयांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आज पिसाळ यांनी आपला उमेवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुती आणि महाआघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये पक्षांचे विभाजन झाल्यामुळे एकमेकांसोबत असलेले नेते आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. काल वाईमधून माजी मंत्री स्व. मदन आप्पा पिसाळ यांच्या स्नुषा व माजी जि. प. अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांच्या नावावर पक्षातर्फे शिक्कामोर्तब करण्यात आले.
वाई मतदारसंघातून अरुणादेवी पिसाळ, डॉ. नितीन सावंत, बंडू ढमाळ, रमेश धायगुडे, अनिल जगताप, कैलास जमदाडे, यशराज भोसले, निलेश डेरे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वी डॉ. नितीन सावंत यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली होती. सोशल मीडियावर देखील तुतारीसोबतचे त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. मात्र, पिसाळ कुटुंबीयांच्या वतीने उमेदवारी मिळण्यासाठी पवारांकडे जोर लावल्याने अखेर अरुणादेवी पिसाळ यांना रविवारीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रचाराला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बावधनमध्ये रविवारी सायंकाळी उमेदवारी भरण्याच्या अनुषंगाने कार्यकत्यांची बैठक पार पडली. मात्र, अधिकृत उमेदवारीची घोषणा ही सोमवारी दुपारी करुन अरुणादेवी पिसाळ यांच्या गळ्यातच अखेर पवारांनी उमेदवारीची माळ घातली.