कराड प्रतिनिधी | प्रगतशील सेंद्रिय शेतकरी व खळे (ता. पाटण) गावचे सुपुत्र अरुण चंद्रकांत कचरे यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले.
वरळी (मुंबई) येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथील भव्य समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्नी सौ. रत्नप्रभा कचरे यांच्यासह त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी मुले मयूर व संकेत कचरे उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, कृषी सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र भिनवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कचरे यांनी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व कथा, पटकथा लेखक, गीतकार म्हणून राज्यात नावलौकिक मिळवला आहे. बळीराजाचं राज्य येवू दे, काळूबाईच्या नावानं चांगभलं, कुंडमाऊली मळगंगा या चित्रपट निर्मितीसह कृणाल म्युझिक कॅसेट कंपनीच्या माध्यमातून अडीच हजारपेक्षा अधिक गीतांचे लेखन केले.
अरुण कचरे यांनी वाघेरी येथे शेती विकत घेवून खडकाळ माळरानावर सेंद्रिय व आधुनिक पद्धतीच्या शेतीला सुरुवात केली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी अभिनंदन केले.