सातारा प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साताऱ्यातील आताचं प्रतापसिंह हायस्कूल म्हणजेच तत्कालीन गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये 7 नोव्हेंबर 1900 रोजी प्रवेश घेतला होता. हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिवस’ देशभर साजरा व्हावा, यासाठी दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले. आता अधिकृत अधिसूचना काढण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना ७५ लाख पत्रे पाठवणार असून, याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून करणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी म्हंटले.
संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कार्यक्रमास विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले, यापूर्वी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातून १ लाख २५ हजार पत्र दिल्लीला पाठवण्याची मोहीम राबवली होती. या मोहिमेचा परिणाम म्हणून तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ७ नोव्हेंबर हा दिवस भारतभर साजरा करण्यासंदर्भात सहमती दर्शवली. तथापि अधिसूचना निघण्यापूर्वीच त्यांचा कार्यकाल संपला. त्यामुळे विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा या ७५ लाख पत्रांच्या माध्यमातून साद घालणार आहे.
‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून ज्यांना जगात संबोधले जाते आणि जगातला सर्वांत हुशार विद्यार्थी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साताऱ्यातील छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूलचे विद्यार्थी होत. त्यामुळे या हायस्कूलला अनन्यसाधारण महत्व आहे. आजही या हायस्कूलच्या प्रवेश अभिलेखात डॉ. आंबेडकरांचे नाव भीवा रामजी आंबेडकर असे असून, १९१४ क्रमांकाला तशी नोंद आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षक दिन व डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस का साजरा व्हायला नको? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. साताऱ्याचा हा ‘विद्यार्थी दिवस’ भारतभर होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे अरुण जावळे यांनी स्पष्ट केले.