कराड प्रतिनिधी | आपल्या स्वच्छतेमुळे नाव कमावलेल्या मलकापूर येथील अभियंत्यास आज लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. तब्बल ३० हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली. यामध्ये नगर अभियंता गट क वर्गमधील शशिकांत सुधाकर पवार (वय 37, रा. मंद्रूळ कोळे, ता. पाटण जि. सातारा, सध्या रा. वसंत विला पाच मंदिर जवळ कोयना वसाहत, कराड व खाजगी इसम सुदीप दीपक इटांबे ( वय 29, रा. माऊली कॉलनी,मलकापूर ता. कराड) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर येथील नगर अभियंता गट क वर्गमधील शशिकांत सुधाकर पवार यांनी एका दुय्यम ठेकेदारकडे 42,000 रुपयांची मागणी केली होती. यातील तक्रारदार हे दुय्यम ठेकेदार असून त्यांची फर्म असून तक्रारदार हे मूळ ठेकेदारांच्या फर्म अंतर्गत ठेकेदारीचे काम करतात. तक्रारदार यांनी वाखण भागातील सुनील पवार घर ते कलबुर्गी घर असे रस्त्याचे काम केले होते. त्याचे एकूण 21 लाख 75 हजार रुपये बिल झाले होते त्यापैकी 15 लाख रुपये तक्रारदार यांना मिळाले असून उर्वरित बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी 42,000 रुपये लाचेची मागणी केली होती.
आरोपी लोकसेवक शशिकांत पवार यांनी मागणी करून तडजोडीअंती 30 हजार रुपये रक्कम खाजगी इसम नामे सुदीप दीपक एटाबे (वय 29, रा. माऊली कॉलनी मलकापूर, ता. कराड) याच्याकडे देण्यास सांगून खासगी इसम एटाबे याचे करवी लाचेच्या रकमेचा स्वीकार केला आहे. म्हणून आरोपी लोकसेवक शशिकांत पवार नगर अभियंता मलकापूर नगरपरिषद व खासगी इसम सुदीप एटांबे यांना 30,000 रु लाचेच्या रकमेचा स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्ज्वल अरुण वैद्य यांनी दिली.
सदर कारवाई पोलीस उपाधीक्षक श्रीमती उज्ज्वल अरुण वैद्य, पो. ना. प्रशांत नलावडे, पो. ना. निलेश चव्हाण, पो. शि. तुषार भोसले, चा. पो. ना मारुती अडागळे यांनी पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे यांच्या मार्ग दर्शनाखाली केली.
यावेळी सर्व नागरीकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. याबाबत कार्यालयीन क्रमांक 02162-238139 येतेच किंवा सातारा कार्यालय मेल आयडी [email protected] यावर आपण आपली तक्रार नोंदवू शकता. तसेच टोल फ्रि क्रं. 1064 वर सुद्धा तुम्ही तक्रार दाखल करू शकता.