इमारतीवरून ढकलून देऊन प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकरास अटक; 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | दुसऱ्या मुलाशी अफेअर असल्याच्या संशयावरून प्रेयसी आरूषी मिश्रा हिला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकराला आज शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांनी संशयितास दि. ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ध्रुव राजेशकुमार छिक्कारा, असं त्याचं नाव आहे.

वाद विकोपाला गेल्यानंतर तरुणीला दिलं ढकलून

मृत तरूणी आरूषी मिश्रा ही मूळची बिहारमधील मुजफ्फरपूरची रहिवासी होती. सध्या ती कराडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. संशयित ध्रुव छिक्कारा हा देखील वैद्यकशास्त्राच्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. तो मलकापुराया सनसिटीमध्ये रहात होता. सोमवारी त्याने आरूषीला त्याया फ्लॅटवर बोलवले. आरूषी फ्लॅटवर गेल्यावर सायंकाळी दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने संशयिताने तिला गॅलरीतून ढकलून दिले. तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आरूषीचा जागीच मृत्यू झाला.

संशयितास 3 दिवस पोलीस कोठडी

कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरुषीला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. याप्रकरणी आरुषीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून ध्रुव छिक्कारा याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, घटनेवेळी ध्रुव याच्या पायाला इजा झाली आहे. त्याच अवस्थेत त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने तीन दिवस कोठडी दिली.

मला काही सांगायचंय…

रिमांडची सुनावणी झाल्यानंतर संशयित ध्रुवने आपल्याला काही सांगायचे असल्याची विनंती केली. त्यानंतर न्यायाधीशांनी सर्वांना कोटातून बाहेर जाण्यास सांगितलं. मग ध्रुव छिक्काराने एकांतात आपलं म्हणणं न्यायाधीशांसमोर मांडलं. त्याने नेमकं काय सांगितलं, हे मात्र समजू शकलं नाही.