सातारा प्रतिनिधी । लडाखमधील लेह जिल्ह्यात लष्कराचा ट्रक रस्त्यावरून जात असताना अचानक खोल दरीत कोसळला. या अपघातात 9 जवानांचा जागीच मृत्यू झाला तर 1 गंभीररित्या जखमी झाला. दक्षिण लडाखच्या न्योमा येथील कियारी परिसरात झालेल्या अपघातात सातारा जिल्ह्यातील जवान वैभव संपतराव भोईटे (वय 30, राजाळे ता. फलटण) हेही शहीद झाले आहेत. त्यांच्या मृत्यूमुळे फलटण तालुका शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मूळ गाव हिंगणगाव, ता. फलटण येथील जवान वैभव भोईटे हे राजाळे ता. फलटण येथील राहणारे असून ते या अपघातात शहीद झाले आहेत. वैभव भोईटे हे 311 आर्टिलरी रिजिमेंटमध्ये होते. त्यांच्या युनिटची पोस्टिंग लडाख येथे झाली होती. तेथून ते इतर जवानांसह कारु गॅरीसन येथून लेहच्या क्यारी शहराच्या दिशेने जवानांच्या ट्रकमधून जात होते. लेहजवळील क्यारी शहरापासून 7 किमी अंतरावर तर्क आला असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ते खोल असलेल्या दरीत कोसळले. या अपघातांनंतर जखमी जवानांना तातडीने फिल्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात नऊ जवानांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाला आहे. जखमी झालेल्या जवानावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान, लडाख या ठिकाणी झालेल्या अपघातातील शाहिद जवान वैभव भोईटे हे फलटण तालुक्यातील असून त्यांना एक दीड वर्षाची मुलगी आहे. तसेच त्यांच्या पत्नी या दहिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. वैभव भोईटे यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, मुलगी, भाऊ व भावजय असा परिवार आहे. शहीद जवान वैभव यांचे पार्थिव मंगळवारी गावी येणार असून या ठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.