सातारा प्रतिनिधी | छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची घटना आज घडली आहे. शहीद जवानामध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बावडा येथील सुपुत्र अमर शामराव पवार यांचा समावेश आहे. त्यांच्या मृत्युच्या बातमीनंतर बावडा गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, छत्तीसगड या ठिकाणी नारायणपूर जिल्ह्यात ओरचा भागातून माओवाद्यांच्या विरोधात जंगलात अभियान राबवण्यासाठी डीआरजी आयटीबीटीसह तीन विशेष पथके गेली होती. अभियान राबवून परत येत असताना माओवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला.
या स्फोटामध्ये 2 जवानांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जवान गंभीर जखमी झाले. शहीद अमर पवार हे आयटीबीपी 53 बटालियनचे जवान होते. अमर पवार यां स्फोटात मृत्यू झाला. या घटनेची माहिती पवार यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. तसेच गावातील ग्रामस्थांना बातमी समजल्यानंतर गावावर शोककळा पसरली आहे. अमर पवार यांचं पार्थिव लवकरच गावात आणले जाणार आहे. गावात आणल्यानंतर त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.