सातारा जिल्ह्यात आजपासून ‘या’ तारखेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळावे अशी मागणी करत मराठा बांधवांकडून ठिकठिकाणी आंदोलने केले जात आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आजपासून शस्त्र व जमाव बंदी आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे. आजपासून पुढील १० नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू करण्यात आलेला आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी लागू केल्या आदेशात म्हंटले आहे की, सातारा जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये जास्त संख्येने लोकांना एकत्रितपणे कोणताही कार्यक्रम घ्यायचा असल्यास त्याची पोलीस प्रशासनास कल्पना देणे आवश्यक असणार आहे.

हा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य, अंत्यविधी कार्य तसेच ज्या लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकार, तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असे आदेशात नमूद आहे.