कराड प्रतिनिधी । यंदा देखील ऊस दरावरून विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून आता त्यांच्यानंतर सर्वसामान्य शेतकरी देखील ऊस दरावरून आक्रमक होत असल्याचे बुधवारी दिसून आले. ऊस दरासह विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत एकत्रित येत आज कराड येथील दत्त चौकात जोरदार घोषणाबाजी केली. उसाला प्रति टन 5 हजार रुपये दर द्यावा, मागील वर्षापेक्षा FRP पेक्षा जादा 500 रुपये बिल जमा करावे, म्हैशीच्या दुधास 100 प्रति लिटर तर गाईच्या दुधास 70 रुपये प्रति लिटर दर द्यावा, आदी मागणी करण्यात आल्या. तसेच उद्या गुरुवार दि. कराड येथे ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचा इशारा प्रशासनास देण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रात ऊस हे महत्वाचे पीक मानले जाते. कारण या भागात इतर पिकांपेक्षा शेतकऱ्यांकडून ऊस पिकास अधिक प्राधान्य दिले जाते. दरम्यान, ऊस दरावरून नेहमीच सहकारी साखर कारखाने व शेतकरी संघटना यांच्यात वादावादी होत असते. यावर्षी ऊस दरासह विविध मागण्यासाठी कराड तालुक्यातील किरपे, सुपनेसह जिल्हा परीषद गटातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे.
आज कराड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने एकत्रित येत जयवंत शुगर कारखाना, सह्याद्री सहकारी कारखाना, कृष्णा कारखाना आणि रयत सहकारी साखर कारखान्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच आठ दिवसात मागण्याचा विचार करून द्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.
…तर तीव्र स्वरूपात आंदोलनाने करू
आज शेतकऱ्यांच्यावतीने कराड तालुक्यातील जयवंत शुगर कारखाना, सह्याद्री सहकारी कारखाना, कृष्णा कारखाना आणि रयत कारखाना ऊस दराबाबतच्या करण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्याचा विचार कारखान्यांनी न केल्यास आम्ही येत्या आठ दिवसात मोठे आंदोलने करू, मोर्चे देखील काढू, आम्ही शांततेच्या मार्गाने मागणी करत आहोत, याचा उद्रेक होऊ देऊ नये, असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी देण्यात आला.
‘बळीराजा’ची कराड-पाटणला उद्या निघणार ट्रॅक्टर रॅली
आज कराड येथे करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच बळीराजा शेतकरी संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनाच्या प्रतिनिधींनी उद्या कराड व पाटण तालुक्यात काढण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीबाबत माहिती दिली. उद्या कराड ते पाटण अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार असून सकाळी नऊ वाजता दत्त चौकातून रॅलीस सुरुवात होणार असून या ट्रॅक्टर रॅलीस राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा माजी मंत्री महादेव जानकर व बळीराजा शेतकरी संघटना केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शेतकऱ्यांच्या ‘या’ आहेत महत्वाच्या मागण्या
१) उसाला प्रतिटन 5 हजार रुपये दर द्यावा.
२) मागील वर्षीचे FRP पेक्षा जादा 500 रुपये बिल द्यावे.
३) म्हैस दुधास 100 रुपये व गाय दुधास 70 रुपये प्रति लिटर असा दर द्यावा.
४) शेतकऱ्यांची वाहने व स्थानिक वाहनांना टोलमाफी द्यावी.
५) शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 50 हजार रुपये जमा करावेत.
६) शेतीचे वीजबिल माफ करावेत.