सातारा प्रतिनिधी | पारध्यांच्यादोन गटातील वादावादीत एका तरूणाचा खून झाला आहे. कोरेगाव तालुक्यातील भिवडी त्रिपुटी येथे रविवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुख्य संशयितास अटक करण्यात आली आहे.
पारध्यांच्या दोन गटातील बाचाबाचीचे भांडणा रूपांतर होउन एका तरूणाच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. मयूर नागेश काळे (वय २२, रा. होलार वस्ती, शिरढोण, ता. कोरेगाव), असं खून झालेल्या तरूणाचं नाव आहे. याप्रकरणी सोमवारी पहाटे खून केला. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात सोमवारी पहाटे गुन्हा नोंद झाला असून लकी अतुल शिंदे या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
कोरेगाव तालुक्यातील शिरढोण, त्रिपुटी आणि सिद्धेश्वर कुरोली येथील पारधी समुदायातील तरूणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होते. त्यात कौटुंबिक विषय होता. त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. रविवारी सायंकाळी १५ ते २० तरूण एकत्र जमले होते. त्रिपुटी गावाच्या स्वागत कमानीजवळ त्यांच्यात चर्चा सुरू असताना वादावादी सुरू झाली. लकी शिंदे याने चाकूने मयूर काळे याचा गळा चिरला.
पारध्यांचा नेहमीच गोंधळ सुरू असतो, म्हणून ग्रामस्थांनी त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र महिलांचा गोंधळ वाढत गेल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता तरूणाचा खून झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डीवायएसपी सोनाली कदम, पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, उपनिरीक्षक गणेश माने यांनी घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी शुभम काळे याने दिलेल्या फिर्यादीवरून आशा काळे, भगत काळे (रा. भिवडी-त्रिपुटी, ता. कोरेगाव) आणि लकी शिंदे व अक्सर शिंदे, (रा. सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. लकी शिंदे याला सिध्देश्वर कुरोली येथून पोलिसांनी अटक केली आहे. कोरेगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.