कराड प्रतिनिधी | खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोणंद (ता.खंडाळा) येथील रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी ६५ कोटीच्या अंदाजपत्रकास केंद्राच्या सेतू बंधन योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम आता मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोणंद येथील सईबाई हाउसिंग सोसायटी येथे रेल्वे उड्डाणपुलाची अनेक दिवसांपासून नागरीक मागणी करत होते. त्यांनी यासाठी आंदोलने देखील केली होती. दरम्यान संबंधित नागरिकांनी खासदार पाटील यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्याची दखल घेऊन खा. श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे मंत्रालय आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाशी वेळोवेळी संपर्क साधून पाठपुरावा केला होता. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून तसेच लोकसभेत अति महत्त्वाच्या प्रश्नोत्तराच्या काळात हा मुद्दा उपस्थित करून सदर रेल्वे उड्डाणपुलाची आग्रही मागणी केली होती.
खा. श्रीनिवास पाटील यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नाला अखेर यश आले असून त्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने सीआरआयएफ फंडमधून सेतुबंधन योजनेअंतर्गत एलसी गेट नंबर ४० सईबाई हाउसिंग सोसायटी येथे ६५ कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली आहे. त्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांनी मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. सदरच्या कामाला लवकर प्रारंभ व्हावा, यासाठी महारेलच्या अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत.
दरम्यान खा.पाटील यानी केलेल्या पाठपुराव्यामुळे मागील अनेक दिवसापासून मागणी होत असलेल्या रेल्वे क्रॉसिंग वरील उड्डाणपूलांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे लोणंद येथील नागरिकांन, रेल्वे प्रवासी संघटना यांनी खा. पाटील यांचे आभार मानले आहेत. सातारा लोकसभेच्या क्षेत्रांतर्गत रेल्वे संदर्भात खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्र शासनाकडे सतत केलेल्या पाठपुराव्याने व प्रयत्नाने रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.
पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पात गेलेल्या जमिनींचा मोठा मोबदला खा.पाटील यांच्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मिळाला आहे. तसेच रेल्वे मार्गावरील विविध ठिकाणच्या रेंगाळलेल्या उड्डाणपूलाच्या कामांना गती मिळाली. याशिवाय रेल्वे स्टेशनची सुधारणा, भूसंपादन, शेतीक्षेत्रातील रस्ते, शेतकऱ्यांचे अन्य प्रश्नांची सोडवणूक झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.