सातारा प्रतिनिधी | सातारा-जावलीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कोयना जलाशयात मुनावळे (ता. जावली) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट्स प्रकल्प सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४५.३८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. मुनावळे येथे शिवसागर जलाशयात उच्च दर्जाचे जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट्स सुरु करण्यात यावे, यासाठी आ. शिवेंद्रराजेंचा सतत पाठपुरावा सुरु होता. या प्रकल्पाला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पाचे काम कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून केले जाणार असून प्रकल्पाचा पहिला टप्पा ८ महिन्यात आणि दुसरा टप्पा २० महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी नियमानुसार आवश्यक त्या विमा सवलती व वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पामध्ये वॉटर स्पोर्ट्स आणि ऍक्वाटीक टुरिझम म्हणजेच जलपर्यटन यांचा समावेश आहे.
या महत्वकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने जावली तालुक्यातील मुनावळे, कास, बामणोली या भागातील पर्यटनवाढीला मोठी चालना मिळणार आहे. तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने जावलीतील पर्यटनाला एकप्रकारे नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे सातारा- जावली मतदार संघातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.