सातारा प्रतिनिधी । कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या प्रयत्नामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कोरेगाव मतदारसंघातील प्रमुख पाच रस्त्यांच्या विकासाला मान्यता देण्यात आली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्त्वत: मान्यता दिल्यामुळे 27.5 किलोमीटरचे रस्ते विकसित होणार आहेत. त्यामुळे सातारा आणि खटाव तालुक्यातील नागरिकांची दळणवळणाची अधिक चांगली सोय होणार आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ना. महेश शिंदे यांनी मतदारसंघातील रस्ते विकासाचा प्रस्ताव ना. महाजन यांच्याकडे सादर केला होता. त्यास खास बाब म्हणून मंजुरी देण्याची शिफारस जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती. त्यानुसार ग्रामविकास मंत्रालयाने रस्ते विकास योजनेत पाच रस्त्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे अनेक वर्षे रस्त्यांपासून वंचित असलेली गावे विकासाच्या मार्गावर येणार आहेत.
ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील यांच्या स्वाक्षरीने सोमवारी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये खिंडवाडीमार्गे नवीन एमआयडीसी-कारंडवाडी-देगाव तळे वस्ती-खोल ओढा-देगाव-राजेवाडी-निगडी-देवकरवाडी-अपशिंगे हा रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून गणला जाणार आहे.
या 12 किलोमीटरच्या रस्त्यांचा विस्तार आणि डांबरीकरण होणार आहे. खटाव तालुक्यातील खटाव-शिंदेवाडी (तीन किमी), खटाव-आमलेवाडी (पाच किमी), विसापूर सावंत वस्ती-रामेश्वर डोंगर (पाच किमी), विसापूर जरग वस्ती-खातगुण (अडीच किमी) या रस्त्यांचाही विस्तार होणार आहे.