सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभाग अंतर्गत सरळ सेवा भरतीने एकूण ८३ ग्रामसेवकांना मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने नियुक्ती आदेश देण्यात आले. समानीकरण पद्धतीने तालुका निहाय रिक्त पदे भरण्यात आली आहेत.
सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गातील ९७२ पदांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ग्रामसेवकांच्या १०१ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. भरती प्रक्रियेदरम्यान पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करुन त्यांना मंगळवारी समपुदेशनाने नियुक्ती आदेश देण्यात आले.
या प्रक्रियेसाठी ८३ उमेदवार हजर होते. तालुका निहाय समुपदेशन प्रक्रिया दरम्यान सभागृहांमध्ये मोठ्या स्क्रीनवर तालुका निहाय रिक्त असलेल्या ग्रामपंचायतींची माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना नियुक्ती देण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील सातारा ११, कोरेगाव १४, खटाव ५, माण ७, फलटण ३, खंडाळा ३, वाइ ६, महाबळेश्वर २, जावळी ७, कराड १०, पाटण १५ अशा ८३ जणांना नियुक्ती देण्यात आली.
ही प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले , प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सतीश बुद्धे, सहायक गट विकास अधिकारी राजेंद्र जाधव, अधीक्षक प्रशांत कुलकर्णी, विस्तार अधिकारी संदीप दीक्षित, ग्रामपंचायत अधिकारी संकेत शेडगे, नंदकुमार भोसले, संजय जाधव, विजय ढाणे,अविनाश कवळे आदी उपस्थित होते.