सातारा प्रतिनिधी | राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणा-या दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य साधणे, उपकरणे खरेदीसाठी तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्रद्वारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शाररीक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील उदा.चष्मा,श्रवणयंत्र,ट्रायपॉड,स्टिक व्हील चेअर,फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, कंबर बेल्ट सर्वाकल कॉलर इत्यादी. तसेच केंद्र शासनाच्या कर्मिक विभागाव्दारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र,मन शक्ती, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल.
सदर योजनेसाठी लाभार्थ्यांचे खात्यामध्ये थेट लाभ वितरण प्रणालीव्दारे 3 हजार रुपये निधी वितरण करण्यात येणार आहे. योजनाचा सातारा जिल्हयातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा या कार्यालयाकडे संपर्क करावा.