सातारा प्रतिनिधी । राज्यातील युवक युवतींसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रांत रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
शासनाच्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. त्या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती हेण्यासाठी तसेच कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक युवतींना व्हावा, विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची संधी स्वतःच्या महाविद्यालयांत उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून शासनाने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे.
या योजनेअंतर्गत जिल्हयातील इच्छूक महाविद्यालयांत कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करुन १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना भविष्यातील कौशल्य अभ्यासक्रमांच्या प्रशिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. या करीता केंद्र शासनामार्फत निश्चित केलेल्या कॉमन कॉस्ट नॉर्म नुसार कौशल्य विकास केंद्रांना विविध टप्प्यांमध्ये प्रति प्रशिक्षणार्थी सरासरी रु. ९०००/ ते १५०००/- पर्यंत प्रशिक्षण शुल्क अदा करण्यात येते. इच्छुक महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” स्थापन करण्याचा राज्य शासनाचा मनोदय आहे. या करीता https://forms.gle/m1UAJSW42prB8XGy9 ही लिंक तयार करण्यात आली असून त्याद्वारे महाविद्यालयांत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” स्थापन करण्यासाठी अर्ज करावयाचा आहे.
तरी या योजनेचा जास्तीत जास्त महाविद्यालयांनी लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बस स्थानकाच्या बाजूला, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, सातारा या ठिकाणी किंवा ०२१६२ २३९९३८ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार विभाग सातारचे सहायक आयुक्त श्री. सुनिल शं. पवार यांनी केले आहे.