कालव्यातून पाणी उपसा प्रतिबंधासाठी जलसंपदा विभागाचे महत्वाचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा जिल्ह्यात कोरेगाव, माण, खटावसह काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या तालुक्यात समन्यायी पद्धतीने सिंचनासाठी आवश्यक पाणी विसर्ग पोहचण्यासाठी अडचण निर्माण होणार असल्याचे लक्षात घेत सिंचन विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे तालुक्यातील कालव्याच्या दोन्ही बाजूला आवश्यकतेनुसार ३० मीटर ते ५० मीटर अंतरावर कलम १४४ आदेश लागू करण्याची मागणी सातारा सिंचन विभागाकडून करण्यात आली होती. त्याला अनुसरून कार्यवाही करत संबंधित तालुक्यातील तहसीलदारांमार्फत कालव्याच्या दोन्ही बाजूला गरजेनुसार तीस मीटर ते पन्नास मीटर अंतरापर्यंत कलम १४४ प्रमाणे अनधिकृत पाणी उपसा प्रतिबंधक मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील विहिरी, तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. मात्र, कालव्यातून अनधिकृतरीत्या पाणी उपसा केला जात असल्यामुळे कालव्याच्या शेवटपर्यंत पाणी पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यातून जनप्रक्षोभ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची संभाव्यता आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी सातारा सिंचन विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे कालव्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला आवश्यकतेनुसार ३० मीटर ते ५० मीटर अंतरावर कलम १४४ अंतर्गत अनधिकृतरीत्या पाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या हेतूने आदेश जारी करण्याची मागणी केली होती.

त्याला अनुसरून संबंधित तालुक्यातील तहसीलदारांच्या आदेशाने ३० एप्रिलपर्यंत कालव्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला गरजेनुसार ३० मीटर ते ५० मीटर अंतरापर्यंत अनधिकृत पाणी उपसा चालू करण्यास प्रतिबंध करण्यासाठी कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केले असल्याचे पत्रकाद्वारे अवगत करण्यात आले आहे. दरम्यान, सद्यपरिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी संबंधित आदेशाचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहेत.