खंडोबा यात्रेचे योग्य नियोजन करून यात्रा साजरी करावी; पाल नियोजन बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
2

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील पाल येथील खंडोबा देवाची यात्रा शनिवार, दि. ११ रोजी आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पाल येथे प्रशासनाची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत अलीकडच्या काळामध्ये उत्सवामध्ये लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत. त्या पद्धतीने सुविधा देणे गरजेचे आहे. सुविधा देताना उपलब्ध असणारे स्त्रोत हे मर्यादित आहेत. त्यामुळे कमी स्त्रोतांमध्ये योग्य नियोजन करून खंडोबा यात्रा कोणत्याही अपघाताशिवाय आनंदाने पार पाडावी, असे मत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार मनोज घोरपडे, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, मानकरी देवराज पाटील, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे, सरपंच सुनीता घाडगे, उपसरपंच गणेश खंडाईत, सुरेश पाटील उपस्थित होते.

आमदार मनोज घोरपडे म्हणाले, महाराष्ट्राच्या लाखो भाविकांचे खंडोबा हे कुलदैवत आहे. यात्रा काळामध्ये सर्व विभागाच्या विचाराने आराखडा तयार करावा. देवस्थानचे प्रलंबित विषय आहेत, यामध्ये यात्रेच्या अनुषंगाने बैठक घेऊन देवस्थानचे नियोजन केल्यास या देवस्थानला पर्यटन दर्जा मिळेल. या गावचा कायमस्वरूपी एसटी स्टँडचा विषय महत्त्वाचा आहे, शासनाने पुनर्वसनाची जागा बसस्थानकासाठी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

वैशाली कडूकर म्हणाल्या, भाविक यात्रेमध्ये देवदर्शनासाठी येतात. भाविकांना देवाचे दर्शन मिळावे यासाठी २ उपविभागीय अधिकारी, ५० पोलिस उपनिरीक्षक, ५०० ते ६०० पोलिस व होमगार्ड यात्रेदरम्यान असणार आहेत. तसेच, दक्षिण वाळवंटामध्ये ठिकठिकाणी स्क्रीन बसवल्यास भाविकांना मंदिरामध्ये होणारे देवाचे विधी पाहता येतील. यावेळी देवराज पाटील व सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस महत्वाचे अधिकारी. कर्मचारी आणि कमिटीतील सदस्य उपस्थित होते.