सर्वच घरगुती वीजग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा; MSEB च्या संचालिका नीता केळकरांचे आवाहन

0
2150
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात महावितरणतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 व प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे मोठे काम सुरु आहे. या योजनांसह महावितरणतर्फे सुरु असलेल्या सर्वच कामांची एमएसईबी सूत्रधारी कंपनीच्या संचालिका सौ. नीता केळकर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेकरीता राष्ट्रीयीकृत बँकांही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत. पत्र्याच्या घरावर सुद्धा सौर पॅनल बसवता येतात. त्यामुळे छोट्या मोठ्या सर्वच घरगुती वीजग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन केळकर यांनी केले.

बैठकीस भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, भाजप जिल्हा सचिव महेंद्र कदम, मासचे अध्यक्ष संजोग मोहिते, सचिव दीपक पाटील, माजी अध्यक्ष राजेंद्र मोहिते, भरत शेठ, महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्राहक व उद्योजक प्रतिनिधी यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.

सौ. केळकर म्हणाल्या, शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर प्रकल्पांना वेग दिला आहे. सातारा जिल्ह्यात 208 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे काम सुरु आहे. त्यातील बिजवडी व धोंडेवाडी येथे प्रत्येकी 5 मेगावॅट असे 10 मेगावॅटचे प्रकल्प सुरु देखील झाले आहेत. मागेल त्याला सौरपंप योजनेतून शेतकऱ्यांना 90 ते 95 टक्के अनुदानातून सौरपंप दिले जात आहेत.य घरगुती ग्राहकांसाठी सूर्यघर योजनेची अंमलबजावणी होत आहे.

सूर्यघर योजना घरगुती ग्राहकांना विजेच्या दृष्टीने स्वावलंबी करणारी आहे. सूर्यघर योजनेसाठी 1 किलोवॅटला 30 हजार, 2 किलोवॅटला 60 हजार तर 3 किलोवॅट किंवा त्यापुढील प्रकल्पासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान मिळते. या योजनेला अनेक राष्ट्रीयीकृत बँकाही अल्प व्याजदराने कर्जपुरवठा केला जातो. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असून एजन्सी निवडण्याचे स्वातंत्र्यही ग्राहकालाच असल्याचे सौ. केळकर यांनी सांगितले.