महावितरणाचा लाचखोर कर्मचारी ‘लाचलुचपत’ विभागाच्या जाळ्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । विजेचा ट्रान्सफॉर्मरवर बसविण्यासाठी सहाशे रुपयांची लाच स्वीकारताना गोंदवले कार्यालयातील लाइन हेल्परला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा घालून रंगेहात पकडले.

विशाल लाला जाधव (वय २७) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती अशी, की पळशी, ता. माण येथील तक्रारदार यांच्या शेतात दोन विद्युत मोटार कनेक्शन असून, पंधरा दिवसांपूर्वी डीपी जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या जागी नवीन डीपी आणून बसविण्यासाठी संशयित विजय जाधव याने दोन वीज कनेक्शनचे प्रत्येकी तीनशे रुपयेप्रमाणे एकूण सहाशे रुपयाच्या लाचेची मागणी केली.

ही रक्कम तक्रारदाराने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास संशयितास दिली. दरम्यान, सातारा लाचलुचपत प्रतिबंध पथकाने छापा घालून विशाल याला लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सापळा कारवाईत लाचलुचपत प्रतिबंध सातारा कार्यालयाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, नीलेश राजपुरे आदींचा समावेश होता.