सातारा प्रतिनिधी | सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी दोन कारवाया करत लाचखोरांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. एका घटनेत महसूल सहाय्यक १० हजाराची तर दुसऱ्या घटनेत वाटप पत्राची सातबाराला नोंद करण्यासाठी २० हजाराची लाच घेताना खासगी इसम सापळ्यात अडकला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिलेली माहिती अशी, वडीलोपार्जित जमिनीचे वाटप पत्र करून मिळण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. वडूज तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक विजय बंडू काळे वाटप पत्र आदेश करून देतो म्हणून स्वतःसाठी व तहसिलदारांसाठी १२,००० रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १०,००० लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विजय बंडू काळे (मूळ रा. गुरसाळे, ता. खटाव) यास रंगेहात पकडले.
दुसऱ्या घटनेत तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजाराची लाच घेताना खासगी इसमाला सापळा रचून पकडण्यात आले आहे. श्रीमंत गोविंद खाडे (रा. एनकूळ, ता. खटाव), असे त्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीचे व घराचे वाटणी पत्र करून सातबारा उताऱ्याला नोंद करण्यासाठी २५,००० रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ठरलेली २०,००० रुपये लाच घेताना कातरखटाव येथील मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या समोर खाजगी इसम श्रीमंत खाडे याला रंगेहात पकडले.
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, हवालदार नितीन गोगावले, निलेश राजापुरे, विक्रम कणसे, पोलीस नाईक गणेश ताटे, निलेश येवले यांनी या कारवाया केल्या आहेत.