कश्मिरासह चौघांकडून 14 कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फसवणुकीच्या गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कश्मिरा पवारसह तिच्या चार साथीदारांवर भारतीय संरक्षण मंत्रालयातील टेंडर देण्याचे आमिष दाखवून १४ कोटी ४९ लाख रुपये ५० हजार १६३ रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

कश्मिरा संदीप पवार (रा. सदरबझार), गणेश हरिभाऊ गायकवाड (रा. गडकर आळी), युवराज भीमराव झळके (रा. कामाठीपुरा), तसेच अनिल वायदंडे या मृत व्यक्तीवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रमोद तानाजी जगताप (वय ४८, रा. संभाजीनगर, सातारा, सध्या रा. धायरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

प्रमोद जगताप यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. कश्मिरासह सर्व संशयित त्यांना भेटले होते. या वेळी संशयितांनी कश्मिरा ही पंतप्रधान कार्यालयामध्ये पंतप्रधान यांची राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगितले. खात्री पटण्यासाठी त्यांनी त्याबाबतची कागदपत्रेही जगताप यांना दाखवली.

विश्वास संपादन केल्यावर त्यांनी संरक्षण मंत्रालय भारत सरकार यांना २१५ कोटी रुपयांचे साहित्य पुरवण्याचे टेंडर तुम्हाला मिळवून देतो, असे आमिष जगताप यांनी दाखविले त्याचबरोबर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जम्मू काश्मीर यांना १९७ कोटी रुपयांचे धान्य पुरवण्याचेही टेंडर देतो, असे त्यांनी जगताप यांना सांगितले. संशयितांनी जगताप यांना याबाबतचे टेंडर कॉपी, सर्व कागदपत्रे, पत्रे दाखवून तसे व्हॉट्सअॅप व ई मेल पाठवून बनावट टेंडर देऊन १ कोटी ४६ लाख ५० हजार रुपये व १ कोटी ३ लाख रुपये किमतीचे सोने जगताप यांच्याकडून घेतले, तसेच जगताप यांचे पार्टनर योगेश हिंगणे यांच्याकडून संशयितांनी १२ कोटी रुपये घेतले.

२०१७ ते जुलै २०२३ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पैसे घेतल्यानंतर संशयितांनी कोणतेही प्रत्यक्ष टेंडर दिले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे जगताप व त्यांचे पार्टनर हिंगणे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.