सातारा प्रतिनिधी । “आपल्याला साम, दाम, दंड भेद सगळे वापरा असे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांनी काहीही वापरले तरी आपण स्वाभिमानी आहोत. सातारा हा स्वाभिमानी आहे आणि दिल्लीवर राज्य करणारा सातारा जिल्हा आहे. त्यामुळे दिल्लीसमोर आम्ही झुकणारे नाही. भाजपचे वरिष्ठ नेते वेगळ्या प्रकारचे राजकारण करत आहेत. महाराष्ट्र आणि देशाला पवार साहेबाशिवाय पर्याय नाही,” असे संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांनी म्हंटले.
सातारा जिल्ह्यातील फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. फलटण येथील जाहीर पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदींची उपस्थिती होती.
पक्ष प्रवेश करताच संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी संजीवराजे म्हणाले की, फलटण, माळशिरस, माण तालुक्यातील पाणी दुसरीकडे नेण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, त्याला आळा घालण्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. रामराजे, रघुनाथराजे आणि माझे राजकारण अपक्ष म्हणून सुरू झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरीराने एका बाजूला होतो आणि मनाने एका बाजूला होतो हे तुम्हाला माहिती आहे.
मुळात आम्ही हा निर्णय घेण्याऐवजी कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे आपण शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय आपण घेतला आहे आणि त्याला तुमच्या सगळ्यांचा होकार आहे असे मी गृहीत धरतो. तुतारी चिन्ह माहिती नव्हते. मात्र, शरद पवार साहेब, विजयसिंह दादा यांच्यामुळे सर्वांना माहित झाले असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले.
फलटणमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळं तालुक्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. दीपक चव्हाण हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पक्ष प्रवेशापूर्वी त्यांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवार यांनी केली होती. मात्र, त्यांनी अजितदादांची साथ सोडतात शरद पवार यांची तुतारी हाती घेतली आहे.