जिराफाने गद्दारी केल्याने पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर; संजय राऊतांची शंभूराज देसाईंवर घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पाटण विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भानुप्रताप न उर्फ हर्षद मोहनराव कदम यांच्या प्रचारार्थ कोपरखैरणे, मुंबई येथे नुकतीच सभा पार पडली. यावेळी खासदार संजय राऊत यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला. “ज्यांना शिवसेनेने आमदार केले, मंत्री केले, महत्त्वाची खाती दिली, त्यांनी गद्दारी केली. जिराफाने गद्दारी केल्यामुळे पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर गेली असल्याचे राऊत यांनी म्हंटले.

मुंबई येथे नयक्तीच एक प्रचार सभा पार पडली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, तालुकाप्रमुख सचिन आचरे, सुरेश पाटील, सतीश काळगावकर, संजय संकपाळ, रामचंद्र पवार, शिवसैनिक उपस्थित होते. सभेवेळी खासदार राऊत पुढे म्हणाले की, पाटणला गद्दारीची कीड लागली असून पाटणवासीय ती पुसून टाकतील. पाटणची उमेदवारी घराणेशाहीच्या बाहेर गेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वाभिमानी तरुणाला संधी दिल्याने हे घडले आहे. मात्र, सत्यजित पाटणकर नेमके कशासाठी उभे राहिले? पाटणला १९६७ ला भूकंप झाला आता होता. आता दुसरा भूकंप २३ डिसेंबरला होणार आहे. त्याचा केंद्रबिंदू हर्षद कदम असेल. शिवसेना एक कुटुंब म्हणूनच राहते. तसेच शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने भल्याभल्यांना पाडले आहे.

पाटणमध्ये हर्षद कदम टिकेल आणि गद्दारांना पाडेल. देसाई-पाटणकर यांनी तालुक्यात काय विकास केला. जास्तीत जास्त दारूची दुकाने निघाली. शंभूराज देसाईंकडील खाते सर्वात भ्रष्ट खाते आहे. याची लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी आहे. आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे रक्षणकर्ते असून त्या ४० मधला गद्दार पुन्हा आमदार दिसणार नाही. पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील, त्याचे हात बळकट करण्यासाठी हर्षद कदमांना विजयी करा.

यावेळी हर्षद कदम म्हणाले, गद्दारी आणि बंडखोरीला लढा देण्यासाठी माझा संघर्ष सुरू असल्यामुळे दोघांचा सर्व गोतावळा जमिनीवर आला आहे. तालुक्यात तिसरा मोठा झालेला यांना चालत नाही. त्यांच्यासमोर सर्वसामान्य; पण एक कडवट शिवसैनिक उभा आहे. आम्ही लढणारे आहोत, पळून जाणारे नाही. पाटणवाल्यांनी आघाडीच्या नावाखाली आमचा वापर करून घेतला. तालुक्यात खूप काही करण्यासाठी आहे, पण ती मानसिकता विरोधकांची नाही.