विकसित भारत संकल्प यात्रा 100 टक्के यशस्वी करा – सहसचिव अनिता शहा अकेला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राबविण्यात येत असलेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन, केंद्र शासनाच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव अनिता शहा अकेला यांनी केले.

विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाच्या सातारा जिल्ह्यातील सुरु असलेल्या अंमलबजावणीचा आढावा श्रीमती शहा अकेला यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्यासह विकसित भारत यात्रा कार्यक्रमाचे सर्व नोडल अधिकारी व संबंधित विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या कार्यक्रमांची त्यातून दिलेल्या लाभांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. नोडल अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य अधिकारी, आशासेविका, अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातून जिल्ह्यात चागंले काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. या कामांची माहिती पाहून श्रीमती शहा अकेला यांनी समाधान व्यक्त केले.

या यात्रेसाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून स्क्रीनवरून योजनांच्या ध्वनीचित्रफिती प्रसारित करण्यासह योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. आज अखेर विकसित भारत यात्रेला सुमारे ४५ हजारांपेक्षा जास्त नागरीकांनी भेट देऊन योजनांची माहितीचा लाभ घेतला असून यात्रेदरम्यान ३० हजाराहून अधिक नागरिकांनी संकल्प प्रतिज्ञा घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.