साताऱ्यातील पाटखळमधील घटनेतील पेटवलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जुन्या वादातून झालेल्या भांडणात संशयित शिवजीत माने या युवकाने त्याच्या तीन साथीदारांच्या साह्याने अनिल शिंदे या व्यक्तीला भर रस्त्यात पेटवल्याची घटना साताऱ्यातील पाटखळ गावामध्ये मंगळवारी रात्री उशिरा घडली होती. भांडणात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले होते. संबंधित व्यक्तीचा आज सकाळी उपचारदरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी झालेल्या वादावादी प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी शिवजीत माने आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांना अटक केली आहे.

सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटखळ गावामध्ये मित्रासोबत झालेल्या भांडणातून त्याच्या वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितासह चाैघांना ताब्यात घेतले आहे.

अनिल मधुकर शिंदे (वय ४४, रा. पाटखळ, ता. सातारा), असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत अधिक माहिती अशी की, पाटखळ येथील राहणारे अनिल शिंदे यांचा मुलगा प्रज्वल आणि संशयित तरुण या दोघांची मैत्री होती. त्यामुळे त्याचे प्रज्वलच्या घरी येणे-जाणे असायचे. वर्षभरापूर्वी प्रज्वलचे लग्न झाले. त्यावेळी लग्नामध्ये धक्का लागल्याच्या कारणातून संशयित तरुणाची वादावादी झाली होती.

पूर्वीचा राग मनात धरून संशयित तरुणाने तीन मित्रांना सोबत घेऊन मंगळवारी रात्री शिंदे यांच्या घरी गेला. त्यावेळी घरात प्रज्वलची आई उज्ज्वला शिंदे या एकट्याच होत्या. तर प्रज्वल पुण्यात आणि वडील बाहेर गेले होते. प्रज्वलला आता फोन करून माफी मागायला सांगा, असं त्याच्या आईला तो सांगत होता. आईने हो, सांगते. तुम्ही दोघे भांडू नका, असं सांगितले. त्यानंतर तेथून ते सर्व निघून गेले. परंतु काही वेळानंतर प्रज्वलचे वडील अनिल शिंदे हे दुचाकीवरून घरी आले. याचवेळी संशयित तरुणाने पाठीमागून येऊन सोबत आणलेली पेट्रोलची बाटली त्यांच्या अंगावर ओतली. त्यानंतर लायटरने आग लावली. अनिल शिंदे आरडाओरड करत असल्याचे पाहून त्यांच्या पत्नी धावत घरातून बाहेर आल्या. क्षणाचाही विलंब न करता अनिल शिंदे यांनी अशा अवस्थेतही बोअरचे बटण सुरू केले. स्वत: पाण्याचे फवारे अंगावर घेऊन पेटते शरीर विझविले.

या प्रकारानंतर संबंधित संशयित तेथून पसार झाले. जखमी शिंदे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये ते ५६ टक्के भाजून ते जखमी झाले असल्या कारणाने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले होते. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा आज मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी मुख्य संशयितासह चाैघांना मध्यरात्री अटक केली.