सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गुरुवारी सहकार प्राधिकरण सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याची विभागीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी सहकारातील निवडणुकीच्या कामासाठी कोणतीही संस्था दाद देत नसल्यास थेट कारवाई करा, निवडणुकीपूर्वी ऑनलाइनसह इतर सर्व कामे पूर्ण करून घ्या, अशा महत्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
साताऱ्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पार पडलेल्या महत्वाच्या बैठकीस बैठकीसाठी सहसंचालक महेश कदम, कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, सांगली जिल्हा उपनिबंधकांच्या प्रतिनिधी देशमुख, कोल्हापूरचे सहायक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे, सचिव अशोक गाडे यांच्यासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील उपनिबंधक उपस्थित होते.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीला दोन वेळा स्थगिती मिळाली आहे. एकदा लोकसभा निवडणुकीमुळे दुसऱ्यावेळी पावसाळ्यामुळे ही स्थगिती दिली आहे. आता पावसाळ्यानंतर निवडणुका होणार आहेत. त्याचा आढावा यावेळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ज्या संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरनंतर होणार आहेत, त्यांच्या मतदारांची यादी तयार करण्यापासून उर्वरित सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवा. ज्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते त्यांच्यावर थेट कारवाई करा, अशा सूचना बैठकीत आयुक्त कवडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
निवडणुका सप्टेंबरनंतर होणार
सहकारी संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरनंतर होणार आहेत. दरम्यानच्या काळात सध्या सुरू असलेली ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करा. निवडणुकीसह इतर उर्वरित कामे हाता वेगळी करा. आवश्यक वाटल्यास मार्गदर्शन घ्या. सर्व माहिती अपडेट ठेवा, अशाही सूचना कवडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
.