साताऱ्यात संतप्त नागरिकांनी रिकामी भांडी घेऊन अर्धा तास पाण्यासाठी केला रास्तारोको

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात गत आठवड्यापासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या टंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून पाणी उपाययोजनाबाबत पालिकेकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यादोगोपाळ पेठेतील रहिवाशांनी बुधवारी सकाळी रिकामी भांडी रस्त्यावर मांडून रास्ता रोको केला.

सातारा शहरात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अशात पालिकेकडून आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. या कपातीमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. दर्म्यना, कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागत असल्याने शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. तसेच पालिकेचा टँकर वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिर परिसर, बोकील बोळ तसेच काशी विश्वेश्वर मंदिर परिसर येथील नागरिकांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सलग चार दिवसांपासून नळाल पाणीच न आल्याने संतप्त झालेल्या यादोगोपाळ पेठेतील महिलांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर भांडी मांडून पालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.

सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे संदीप सावंत तसेच शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाणी वितरण व्यवस्थेतील सर्व अडचणी दूर केल्या जातील, नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी देण्यात येईल, अत्यावश्यक ठिकाणी टँकर सुरू केले जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. पालिका प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.