सातारा प्रतिनिधी | अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मानधनवाढ, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आदी मागण्यांसाठी मागील एक महिन्यापासून संप सुरू केला असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन केले. यावेळी कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही असा नारा देत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही करण्यात आला.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या (सीटू) वतीने हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे, काॅ. माणिक अवघडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये प्रतिभा भोसले, अनिता चव्हाण, मालन गुरव, मनिषा काटकर, चारुशीला जाधव, चंद्रकला शिंदे, कमल देशमुख, सारिका माने, अर्चना भिसे, उज्वला मुळीक, भारती चव्हाण, शहीदा मुजावर आदींसह सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
लोकशाहीत लोकांच्या मागण्या, प्रश्नांकडे लक्ष देणे हे सरकारचे काम असते. परंतु, गैरमार्गाने सत्तेवर आलेल्या या राज्य सरकारने सेविकांचा संप सुरू होऊन महिना झालातरी लक्ष दिलेले नाही. त्यांचे म्हणणे एेकूण घेतले नाही. याउलट सेविका आणि मदतनीसांना कारवाईची नोटीसा देण्यात येत आहेत. याविरोधात आता आंदोलन करण्यात येत आहे, असे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.