उंडाळेच्या ‘उदयसिह’अन् बारामतीच्या ‘अजित’ दादांचं ठरलं!; कोयना बँकेत 1 तासात 20 मिनिटांच्या चर्चेत कॉंग्रेसला सोडचिट्टीचा निर्णय फायनल?

0
1341
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळ कराड दौरा केला. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी आलेल्या बारामतीच्या अजितदादांनी काँग्रेसच्या उंडाळेच्या उदयसिंह दादांच्या सोबत एक तासाहून अधिक वेळ घालवला. अँड. उदयसिंह पाटील यांच्या कोयना सहकारी बँकेत जाऊन अजित दादांनी सर्व संस्थांच्या प्रमुखांची बैठक घेत असल्याचे सांगत सभागृहात मंत्री मकरंद आबांसमवेत उदयसिंह पाटलांसोबत कमराबंद चर्चाही केली. अजितदादांसोबत झालेल्या चर्चेनंतर अखेर अँड. उदयसिंह पाटलांनी (Udaysinh Patil Undalkar) आपली भूमिका स्पष्ट केली.

‘आमचं राष्ट्रवादी प्रवेशाचं निश्चित ठरलं असल्याचे सांगितल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चेवर शिक्का मोर्तब झाले. त्यामुळे आता काँग्रेसचा हात सोडून उदयसिंहदादा आता ‘हातात’ अजितदादांच्या राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ बांधणार हे निश्चित झाले. रयत संघटनेचे नेते अँड. उदयसिंह पाटील हे कराड दक्षिणचे आमदार नसले तरी त्यांनी संघटना, कारखाना आणि काँग्रेसच्या माध्यमातून आतापर्यंतच्या केलेल्या कामगिरीमुळे त्यांची चर्चा नेहमीच होत असते. त्यांच्याकडे कराड तालुक्यातील रयत साखर कारखान्याचे अध्यक्षपद असून अनेक सहकारी संस्था ते सांभाळत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस असलेल्या अँड. उदयसिंह दादांनी काँग्रेस सोडण्याचा घेतलेला निर्णय हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी नक्कीच धक्कादायक आहे.

कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी ही भूमिका…

उदयसिंह यांनी म्हटले की, स्व. विलासकाकांनी शेवटपर्यंत काँग्रेसची विचारधारा निष्ठेने जोपासली. परंतु, सध्याच्या राजकीय परिस्थितीत रयत संघटना आणि कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी ही भूमिका घ्याव्या लागली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांचे पुरोगामी विचार डोळ्यासमोर ठेवून कार्यरत आहेत. काँग्रेसच्या विचारधारेतूनच राष्ट्रवादी पक्षाची निर्मिती झाली आहे. विलासकाका असतानाची राजकीय परिस्थिती वेगळी होती. त्यांच्यासोबत काम करणारे ८० टक्के लोक त्यावेळी राष्ट्रवादी पक्षात होते. तरीही त्यांच्यात एकमत होत असत. विलासकाकांना त्यांची विचारधारा शेवटपर्यंत जपायची होती. परंतु, विचारधारा जपत असताना संघटना वाढवली नाही, तर त्या विचारधारेला अर्थ उरत नसल्याने आपण ही भूमिका घेतल्याचे अँड. उदयसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.

नेमकी कोणती ऑफर दिली असावी?

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोयना बँकेला भेट देवून तेथील माजी मंत्री दिवंगत विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. बँकेत जाऊन उंडाळकर गटाच्या प्रमुखांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, आमदार मनोज घोरपडे, अमोल मिटकरी हेही त्यावेळी उपस्थित होते. वीस मिनिटांच्या चर्चेत काँग्रेसशी आतापर्यत एकनिष्ठ राहिलेल्या अँड. उदयसिंह दादांना अजितदादांनी नेमकी कोणती ऑफर दिली असावी? हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनामध्ये येत आहे.