सातारा प्रतिनिधी । गौरी पुजन सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटपात सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर होता. आता दिपावली सणानिमित्त शिधा वाटपातही राज्यात प्रथम क्रमांकवर राहिल, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी व्यक्त केला.
सातारा येथील करंजे पेठेतील काळ भैरवनाथ सांस्कृतिक सभागृहात जिल्हाधिकारी श्री. डूडी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार राजेश जाधव, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, सर्व सामान्यांची दिपावली आनंदी व उत्साहात साजरी व्हावी यासाठी शासनामार्फत आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. हा शिधा रास्त भाव दूकानांच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. सातारा तालुक्यात आत्तापर्यंत 58.77 टक्के आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे. उद्यापर्यंत 100 टक्के शिधा वाटप करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी सांगितले.