कराड प्रतिनिधी | वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार “दुष्काळ पाहणी समिती” गठीत केली असून पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज कराड येथे दुष्काळ पाहणी समितीच्या सदस्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीत चर्चा करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी दौरा करून पाहणी दौऱ्यानंतर दुष्काळ परिस्थितीचा 5 जिल्ह्यांचा अहवाल हा पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्र भीषण दुष्काळात होरपळत असून पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. एवढी भयंकर परिस्थिती असताना सरकार मात्र दुष्काळाबाबत निद्रिस्त अवस्थेत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.
या बैठकीस समितीमधील सदस्य तथा पश्चिम महाराष्ट्रातील माजी मंत्री आ. श्री. सतेज पाटील, आ. श्री. राजू आवळे, आ. प्रणिती शिंदे, आ. विक्रम सावंत, आ. संजय जगताप, सांगली जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत कराड येथील बैठकीस समन्वयक श्री. संजय बालगुडे, सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव प्रत्यक्ष उपस्थित होते.
यावेळी बैठकीत आ. श्री. सतेज पाटील, आ. श्री. राजू आवळे, आ. प्रणिती शिंदे, यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थिती लावून त्यांच्या जिल्ह्याच्या दुष्काळ परिस्थितीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना माहिती दिली. यावेळी बैठकीस उपस्थित समितीतील इतर आमदार, सदस्यांनी आपापल्या भागातील पाणी टंचाई, चारा टंचाईसह पाणी समस्येबाबत मुद्दे मांडले.
यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, येत्या दोन दिवसातच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यात समिती सदस्यांसोबत दौरा काढून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. याबाबत दौऱ्याचा आराखडा सुद्धा तयार करण्यावर या मिटिंगमध्ये चर्चा झाली. विरोधी पक्ष म्हणून दुष्काळाची दाहकता सरकारला अजून समजलेली दिसत नसल्याने वेळकाढू भूमिका घेतली जात असल्याचे दिसते. राज्यातील शेतकरी, तसेच त्यांची जनावरे पाण्याविना तडफडत आहेत. शेतीच्या पिकाला पाणी नाही, शेकडो गावामध्ये तसेच शहरामध्ये १५ दिवसातून पाणी येत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी महाराष्ट्र काँग्रेस तत्पर असेल.