सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या आमदाराने शरद पवार यांची भेट घेतली असून दोघांच्यात झालेल्या चर्चेमुळे जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील अजित पवार गटाचे आ. मकरंद पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची नुकतीच भेट घेतली आहे.
आमदार पाटील आणि खासदार पवार या दोघांच्यातील भेटीमुळे मकरंद पाटील पुन्हा शरद पवार गटात येणार की काय?, अशी चर्चा सुरू झाली आहे. पवार यांच्या भेटीवेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, शामराव गाडवे, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर हे उपस्थित होते.
नुकत्याच किसन वीर साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभाच्या भाषणात मकरंद पाटील यांनी आम्ही शरद पवारांशी निष्ठा ठेवून आहोतच. मी घेतलेली भूमिका माझ्या मतदारसंघातील काही सहकाऱ्यांना आवडली नाही; परंतु साखर कारखाना आणि मोठा मतदारसंघाच्या विकास कामांसाठी निर्णय घेतला. त्याचवेळी आ. पाटील यांनी राजकीय तडजोडी आणि शरद पवार यांच्याशी असलेल्या निष्ठेबाबत भाष्य करून आपली भूमिका स्पष्ट केली होती.
तरीही शरद पवार निष्ठावंतांशी वेगवेगळी चर्चा आ. पाटील यांच्या मतदारसंघात करत होते. त्यामुळे या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
या भेटीत शरद पवार यांनी आवर्जून किसन वीर कारखाना व खंडाळा कारखान्यांचे गाळप सुरू झाले का?, काही अडचणी आहेत का?, याची माहिती मकरंद पाटील यांच्याकडून घेतली. आ. मकरंद पाटील आणि दोघांमध्ये सुमारे पाऊणतास विविध विषयांवर चर्चा झाली.