सातारा प्रतिनिधी | सातारा – पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात पुन्हा लोखंडी अँगल स्विफ्ट कारच्या (MH-01 -BG-7760) बोनेटवर आदळल्याची घटना गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून कारचे मात्र, मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार क्रमांक (MH-01 -BG-7760) ही बोगद्यातून जात होती. यावेळी अचानक बोगद्यात लावण्यात आलेला लोखंडी अँगल कारच्या बोणेटवर आदळला. यावेळी कारमधील चालकाने जोरात ब्रेक दाबला.या घडलेल्या घटनेनंतर बोगद्यातून जाणारी वाहतूक काहीकाळ थांबली होती. दरम्यान, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, हा लोखंडी अँगल काढण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (N.H.I.) कडून क्रेन उपलब्ध झाली नाही.
यावेळी महामार्ग पोलिस भुईंज, जोशी विहीर यांनी सदरचा अँगल महामार्ग पोलिसांनी प्रवाशांच्या मदतीनं हातानं उचलून बाजूला केला. यानंतर तब्बल 2.5 तासानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या लेनने सुरु करण्यात आली. यावेळी भुईंजचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षद गालींदे, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, कृष्णकांत निंबाळकर, हवालदार संतोष लेंभे यांनी अँगल प्रवाशांच्या मदतीने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.